कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास

भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेचा इतिहास

भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेमागील तीन प्रेरणा

१.१९२०-१९२२ च्या काळातील राष्ट्रीय ठराव
२.नव्याने विकसित होणारे कामगार
३.रशियन समाजवादी क्रांति

सुरवातीचा काळ: गटांपासून राजकीय पक्ष स्थापनेपर्यंत ऑक्टोबर क्रांतीचा व्यापक परिणाम होता. प्रसारमाध्यमांचा अभाव आणि सत्ताधार्‍यांची बंधने असतानाहीक्रांतीबद्दल कुतूहल,उत्सुकता,आस्था होती. खुद्द केसरीतून लोकमान्य टिळक आणि लाला लाजपतराय या राष्ट्रीय नेत्यांनी बोल्शेविक क्रांति उचलून धरली.
१९२० मध्ये तुर्कस्तानचा सुलतान जो भारतीय मुस्लिमांचा खलिफा होता. त्याला इंग्रजांनी पदच्युत केल्यावर मुजाहिदांचा फार मोठा गट काबुलला रवाना झाला व तेथून सोवियत यूनियन मध्ये गेला. अशा गटाची पहिली बैठक ताश्कंद येथे १९२१ मध्ये झाली. या बैठकीला एम.एन.रॉय उपस्थित होते. भारतात त्यावेळी कम्युनिस्ट विचारांचे छोटे छोटे गट कार्यरत होते. एप्रिल १९२१ मध्ये "गांधी विरुद्ध लेनिन" हे छोटेखानी पुस्तक कॉ. डांगे यांनी लिहून मुंबई,कोलकाता,मद्रास लाहौर,कानपुर येथे प्रसिद्ध केले.वैचारिक मंथनाच्या युगात या पुस्तकाने मोलाची कामगिरी केली. त्यानंतर ऑगस्ट १९२२ मध्ये कॉ. डांगे यांनी " सोशलिस्ट " हे साप्ताहिक सुरू केले. कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करणारे हे हिंदुस्थानातील पहिले साप्ताहिक. त्यामुळे मुंबई प्रांतात कॉ. डांगे यांच्याभोवती एक गट तरुण कम्युनिस्टांचा तयार झाला. कॉ. डांगे,कॉ. पर्वते, कॉ. जोगळेकर,कॉ. घाटे, कॉ. मिरजकर इ.
तसेच गट लाहौर,मद्रास,कोलकाता,कानपुर, येथे तयार होत गेले. व्यापक कायदेशीर पक्ष स्थापन करावा,कम्युनिस्ट पक्षाची गुप्त संघटना तयार करावी ह्याबद्दल एकवाक्यता होती.
१९२३ साली कॉ.सिंगारवेलू यांनी पहिला मे दिन साजरा केला. व लेबर किसान पार्टीची घोषणा केली. कॉ. डांगे यांना निमंत्रण होते पण ते हजार राहू शकले नाहीत. परंतु नंतर 'सोशलिस्ट' मध्ये आपल्या सर्व चळवळींचा उल्लेख या पक्षाच्या नावाने करायला सुरुवात केली. पक्ष स्थापन झाल्यावरही विखुरलेल्या कम्युनिस्टांना एकत्र करून देशभर कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याचे काम होते. देशाबाहेर अशी परिषद व्हावी अशी रॉय यांची सूचना होती तथापि कॉ. डांगे व सिंगारवेलू याबाबत सहमत नव्हते. ब्रिटिश गुप्तहेर संघटनेची या गटांच्या हालचाळीवर कावळ्यासारखी बारीक नजर होती. म्हणूनच कॉ. डांगे, कॉ.शौकत उस्मानी, कॉ.सिंगारवेलू,कॉ. मुझफर अहमद,कॉ.गुलाम हुसेन,नलिनी गुप्ता इत्यादीवर कानपुर कटाचा खटला भरण्यात आला. फेब्रुवारी १९२४ मध्ये खटल्यानिमित्त नेत्यांच्या गाठीभेटी. कॉ.डांगे यांची कम्युनिस्ट पक्ष स्थापन करावा अशी उघड सूचना. कानपूरमधील पत्रकार सत्यभक्त यांनी परिषद घेण्याचे जाहीर केले. २६,२७,२८,डिसेंबर १९२५ कानपुर येथे "कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया" रीतसर स्थापना. कॉ.सिंगारवेलू अध्यक्ष,हसरत मोहानी स्वागताध्यक्ष,कॉ.घाटे सरचिटणीस तर कॉ.डांगे आणि शौकत उस्मानी तुरुंगात हाते.