कॉ.गोविंद पानसरे २० फेब्रु. २०१५ ला शहीद

कॉ. गोविंद पानसरे प्रतिगामी शक्तींनी केलेल्या १६ फेब्रुवारी २०१५ रोजी केलेल्या हल्यानंतर २० फेब्रुवारी २०१५ रोजी शहीदपुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक, कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अँड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (८२) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीसुद्धा जखमी झाल्या. ही घटना पानसरे यांच्या निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांचा अद्याप शोध लागला नसताना त्याच विचारांचे जाहीरपणे सर्मथन करणारे व त्यांच्या चळवळीला बळ देणारे पुरोगामी नेते कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे १६ फेब्रुवारी सकाळी नित्यनियमाप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी ते घराकडे परतत असतानाच दोघा हल्लेखोरांनी पानसरे यांच्यावर पिस्तूलमधून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी पानसरे यांच्या मानेला, दुसरी काखेत तर तिसरी त्यांच्या उजव्या पायाला लागली. या वेळी झालेल्या झटापटीत कॉ. उमा पानसरे खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पानसरे पती-पत्नी रस्त्यावरच कोसळले. ही माहिती समजल्यानंतर घरातून पानसरे यांच्या स्नुषा मेघा, नातू मल्हार व कबीर, तसेच कॉ. मिलिंद कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पानसरे दाम्पत्यांना नजीकच्या अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कॉ. पानसरे यांच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तत्काळ रक्त चढविण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला तसेच त्यांच्या हृदयाचे स्पंदन तसेच नाडीचे ठोके कमी होत होते. तेही योग्य उपचारांनी नॉर्मल करण्यात यश मिळविले. त्यानंतर पानसरे पती-पत्नींवर एकाचवेळी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉ. पानसरे यांना २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार हवाई अम्ब्युलन्स द्वारे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी हलवले परंतु रात्री १०.४५ वा. डॉक्टरांनी कॉ.पानसरेंना मृत घोषित केले

* शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), एलएल. बी. प्राथमिक शिक्षण : जन्मगावी कोल्हार येथे. माध्यमिक शिक्षण ( पी.जी ) : संत गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी, जि. अहमदनगर . महाविद्यालयीन शिक्षण : राजाराम कॉलेज, कोल्हापूर, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतले.
* व्यवसाय : कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेता म्हणून काही वर्षे काम.
* म्युनिसिपालिटीत स्कूल बोर्डात काही काळ प्राथमिक शिक्षक.
* १९६४ पासून वकिली.
* कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अनेक वर्षे अध्यक्ष.
* शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात सहयोगी व्याख्याता म्हणून दहा वर्षे काम.
* राजकीय जीवन : समाजवादी व डावा समाजवादी गट यात प्राथमिक राजकीय कार्य
* १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद.
* दहा वर्षे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी.
* भा. क. प.च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य. राष्ट्रीय कंट्रोल कमिशन चे सचिव
* १९५५ साली गोवामुक्ती आंदोलनात सहभागी.
* गोवामुक्ती आंदोलनातील सहभागाबदल शासनाची मान्यता व म्हणून स्वातंत्र्यसैनिक.
* संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे ऑफिस सेक्रेटरी म्हणून सलग पाच वर्षे काम.
* १९६५ च्या उपासमारविरोधी कृती समितीचे एक नेते.
* विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष. समाजवादी प्रबोधिनी या संस्थेच्या स्थापनेत सहभाग. स्थापनेपासून सलग पंचवीस वर्षे कार्यकारिणीवर सभासद.
* पत्नी, मुलगा, मुलगी इत्यादी सर्व कुटुंब राजकीय, सामाजिक कार्यात सहभागी.
* लिखाण : शिवाजी कोण होता? (१९८४) (एकूण चोवीस आवृत्त्या) कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी , हिंदी भाषेत प्रसिद्ध. आजवर १,00,000 प्रतींची विक्री.
* मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न (१९८३-चार आवृत्त्या)
* अजून न स्वीकारलेला मंडल आयोग (१९९७-दोन आवृत्या)
* मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम (१९९८)
* काही कामगार कायद्यांची तोंडओळख (१९९२-चार आवृत्या)
* ३७0 कलमाची कुळकथा (१९९४)
* मुस्लिमांचे लाड? (१९९४- तीन आवृत्या)
* सच्चर समिति अहवालावर मुस्लिम समाजाचे महाराष्ट्रभर प्रबोधन
* पंचायत राज्याचा पंचनामा
* अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
* राजर्षी शाहू : वसा आणि वारसा (तीन आवृत्त्या)
* शेतीधोरण परधार्जिणे (तीन आवृत्या)
* कामगारविरोधी कामगार धोरणे (तीन आवृत्त्या)
* श्रमिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यात कॉ. अण्णाभाऊ साठे सम्मेलन
* वृत्तपत्रात अनेक लेख. मंडल आयोग, शिवचरित्रावर आणि राजर्षि शाहू महाराज यांच्या पुरोगामी जीवनकार्यावर महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने.
* पुरस्कार : भीमक्रांती पुरस्कार
* समाजिक कार्यासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार
* कोल्हापूरभूषण पुरस्कार.
* प्रतिगामी विचाराच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला १६ फेब्रु. २०१५
* शहीद आणि अंतिम संघर्ष यात्रा २० फेब्रुवारी २०१५
* त्यांच्या कार्यास व स्मृतिस भावपूर्ण आदरांजली